नवी दिल्ली - कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्य़ाच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच दिल्लीच्या पूर्व भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, जर दिल्लीतील सरकारला आमच्या समस्या ऐकवायच्या नाहीत, तर मग कुणाला ऐकवायच्या. आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जायचं का? असा सवाल शेतकरी नेत्यांनी केला आहे.
भारतीय किसान युनियनच्या झेंड्याखाली किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज सकाळी राजधानी नवी दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, राजधानीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे सीमेवरील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मागण्या - 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे- पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा- किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे- भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी- सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा- उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे