चंडीगड : पंजाब-हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर २८ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी देशभरात रेल रोको आंदोलन सुरू केले. या काळात पंजाबमध्ये ५२ आणि हरियाणामध्ये ३ ठिकाणी रेल्वे थांबवण्यात आल्या. हरियाणातील सिरसा येथे रेल्वे ट्रॅक बंद करण्यासाठी जाणाऱ्या ४५ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा यांनी केंद्रावर दबाव आणण्यासाठी रेल रेको आंदोलन केले. किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी, जागतिक बाजार करारातून कृषी क्षेत्र वगळणे आदी मागण्या मान्य न केल्याने शेतकऱ्यांनी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
प्रवाशांना परत पाठवले
संपामुळे रेल्वेने व्यास आणि लुधियानाहून काही गाड्या परत पाठवल्या. यामध्ये शान-ए-पंजाब, अमृतसर एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस, अमृतसर-चंडीगड एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरून परत पाठवण्यात आले. फाजिल्का येथे सुमारे १०० शेतकऱ्यांनी रेल्वे रुळांवर आंदोलन केले. अनेक रेल्वे स्थानकांवर पोलिस बंदोबस्त तैनात होता.
आम्ही आमची ताकद वाढवत राहू
- आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.
- आदर्श आचारसंहिता लागू होण्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही हे आंदोलन ४० दिवसांत जिंकू शकणार नाही. आम्ही आमची ताकद वाढवत राहू, असेही ते म्हणाले.