आळंद : मान्सूनचे आगमन झाले असले तरी आळंद तालुक्यातील हवामान अजूनही कोरडेच आहे़ तालुक्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ तालुक्याच्या कृषी खात्याने चालू खरीप हंगामासाठी एकूण ९३ हजार १९५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ यामध्ये ८३ हजार १९५ हेक्टर क्षेत्र जिरायत तर १० हजार हेक्टर क्षेत्र बागायतीचा समावेश आहे़ तालुक्यातील एकूण पाच रयत संपर्क केंद्राद्वारे एकूण तृणधान्याचे ८ हजार ९९० हेक्टर, द्विदल धान्याचे ५७ हजार २७५ हेक्टर, तेलबियांचे १८ हजार ९३० हेक्टर तर उसाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे़ जूनअखेरपर्यंत उडीद, मूग व तिळाची पेरणी होणे आवश्यक आहे़ सूर्यफूल, तूर व सोयाबीन या पिकांसाठी जुलैअखेरपर्यंतचा कालावधी मानला जातो़ उत्पन्नामध्ये तुरीचे सर्वाधिक ४५ हजार हेक्टर आहे़ त्यापाठोपाठ सूर्यफूल १२ हजार ६००, उडीद ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे़ यावर्षी सोयाबीनचे केवळ ३ हजार ५०० हेक्टर तर तिळाचे २ हजार हेक्टर क्षेत्र निश्चत केले आहे़ सर्व केंद्रामध्ये बी-बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून केवळ समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असल्याचे सहा़ कृषी निर्देशक शशांक शहा यांनी सांगितले़ (वार्ताहर)
आळंद तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत १११
By admin | Published: June 18, 2015 1:39 PM