- रमाकांत पाटील/ ऑनलाइन लोकमत
बुढा (मध्यप्रदेश), दि. 05 - शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै पासून मध्यप्रदेशातील मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील शेतकरी नेते बुढा गावात एकत्र झाले आहे. गेल्या महिनाभरापासून देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्यप्रदेशातील पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येवून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीतर्फे ६ ते १८ जुलै या दरम्यान मंदसौर ते दिल्ली किसान मुक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी पूर्वसंध्येला या सर्व शेतकरी संघटनांचे नेते बुढा या गावात मुक्कामी आले आहे. यात महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे मुख्य संयोजक व्ही.एम.सिंग, आॅल इंडिया किसान सभेचे हन्नान मौला, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक माजी आमदार सुनिलम्, जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह विविध संघटनांचा नेत्यांचा समावेश आहे.- या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच मध्यप्रदेशातील मुख्य शेतकरी नेते सुनिलम् यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली...- गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.