नवी दिल्ली - भारत बंदला 500 हून अधिक शेतकरी संघटना, 15 कामगार संघटना, राजकीय पक्ष, 6 राज्य सरकार आणि इतर अनेक विभाग आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सहाय्यक राज्य सरकारांमध्ये तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश सरकारांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. याच दरम्यान भारत बंदचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस नेते पोहोचले होते पण शेतकऱ्यांनी विरोध करून त्यांना घरी पाठवल्याची घटना आता समोर आली आहे.
दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी (Congress Anil Chaudhary) शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहचले. मात्र आंदोलकांनी मात्र राजकीय आंदोलन नसल्याचं सांगत अनिल चौधरी यांना घरचा रस्ता दाखवला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते प्रविण मलिक यांनी "भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही राजकीय नेत्यांचे आभार मानतो. परंतु, आमच्या प्रश्नांचा आणि मंचाचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही राजकीय पक्षांना आमच्या मंचावर परवानगी देणार नसल्याचं आम्ही आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांना शेतकरी आंदोलन स्थळापासून थोड्या अंतरावर आपलं आंदोलन करण्याची विनंती केली" असं म्हटलं आहे.
अनिल चौधरी यांनी यावर "मी शेतकरी आंदोलकांची परिस्थिती समजू शकतो. हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांना वाटत असेल की आम्ही इथून निघून जावं, तर आम्ही परत जाऊ. आम्ही इथं फक्त शेतकऱ्यांसाठी आलो होतो, यामागे कोणताही राजकीय अजेंडा नव्हता" असं स्पष्टीकरण दिलं आहे. या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांची अनेक महामार्ग जाम केले आहेत, तसेच रेल रोकोही करण्यात येत आहे. सोमवारी आठवड्याच्या आणि कामाच्या पहिल्या दिवशीच दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड जाम झालेला पाहायला मिळत आहे. हायवेवर शेकडो गाड्यांची लांबच-लाब रांग दिसत आहे. याच दरम्यान शेतकरी आंदोलनात हरियाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर येत आहे.
'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर यासंबंधात अधिक माहिती देता येईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. परंतु, यासाठी कोणत्याही बाजुने कोणत्याही अटी-शर्ती लावल्या जाऊ नयेत. मोकळ्या मनाने चर्चा करून या प्रश्नांवर उत्तर काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असं म्हटलं आहे.