नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ जूनला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. वाराणसीतून मोदींनी देशातील ९.२ कोटी शेतकऱ्यांना २-२ हजारांचा निधी ट्रान्सफर केला. आता आणखी एक गिफ्ट शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध निर्णय घेत असते. त्यात सरकारने डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी उडीद आणि तूर डाळीच्या MSP वर १० टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलाच्या MSP दरातही ५ ते ७ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं सांगण्यात येत आहे. त्यासोबत सरकार यंदा बोनसही जाहीर करू शकते. CACP ने सरकारला दिलेल्या शिफारशीत हे म्हटलं आहे. CNBC नं याबाबत वृत्त दिलं आहे.
तूर आणि उडीद डाळीचं उत्पादन कमी होणं चिंताजनक आहे. धानाच्या किंमतीत ४-५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सरकार धानासह १४ पिकांचे एमएसपी ठरवते. कृषी खर्च आणि किंमत आयोग (CACP) च्या शिफारशीनुसार सरकार दरवर्षी २३ पिकांच्या दरांचे MSP दर ठरवते. सीएसीपी हा कृषी मंत्रालयात अंतर्गत येणारा आयोग आहे. त्यात सात तृणधान्ये (मका, ज्वारी, बाजरी, धान, गहू, बार्ली आणि नाचणी), पाच कडधान्ये (मूग, तूर, हरभरा, उडीद आणि मसूर), सात तेल (सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, करडई, भुईमूग, रेपसीड-मोहरी आणि नायजर बियाणे) आणि चार व्यावसायिक पिके (कापूस, खोबरं, ऊस आणि कच्चा ताग) यांचा समावेश होतो.
दरम्यान, कृषी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत येताच नरेंद्र मोदी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भाजपा सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी विभाग कमी पडणार नाही. आमच्या टीमनं १०० दिवसांचा रोडमॅप बनवला आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरुप दिलं जाईल अशी माहिती कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.