शेतीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर; कौर यांचा राजीनामा, विरोधकांचा सभात्याग 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 11:15 PM2020-09-17T23:15:33+5:302020-09-17T23:16:13+5:30

मतदानाआधी काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग; शिरोमणी अकाली दलाच्या कौर मोदी मंत्रिमंडळातून बाहेर

farmers bill passed in lok sabha opposition walkout before voting union minister harsimrat kaur resignation | शेतीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर; कौर यांचा राजीनामा, विरोधकांचा सभात्याग 

शेतीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर; कौर यांचा राजीनामा, विरोधकांचा सभात्याग 

Next

नवी दिल्ली: शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत. ही दोन्ही विधेयकं शेतकरी हिताची नसल्याचा आरोप करत विरोधकांनी मतदानाआधीच सभात्याग केला. काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विधेयकांवर आवाजी मतदान झालं. या विधेयकाला भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं विरोध केला. अकाली दलाच्या नेत्या हससिमरत कौर बादल यांनी विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 



मोदी सरकारनं शेतीशी संबंधित दोन विधेयकं आज लोकसभेत मांडली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत मंजूर झाली. तर याआधीच एक विधेयक लोकसभेत संमत झालं आहे. या विधेयकांना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. देशाचं धान्याचं कोठार अशी ओळख असणाऱ्या पंजाब, हरयाणातले हजारो शेतकरी विधेयकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारनं विधेयकं मागे घ्यावीत, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी केली होती. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही.



लोकसभेत दोन्ही कृषी विधेयकं मंजूर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. 'ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयकांना मिळालेली मंजुरी शेतकरी आणि शेतीसाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांसमोर समस्या आणि अडत्यांमुळे त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होतील,' असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याच्या नव्या संधी मिळतील. त्यामुळे त्यांचा नफा वाढेल. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाचा लाभ होईल. अन्नदात्ता सशक्त बनेल, अशी ग्वाही मोदींनी दिली.

अकाली दलाचा विधेयकांना विरोध; कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
कृषी विधेयकं लोकसभेत मतदानासाठी येण्यापूर्वीच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.




शिरोमणी अकाली दलाची भूमिका काय?
प्रस्तावित कृषी विधेयकांना शिरोमणी अकाली दल विरोध करणार असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी आजच लोकसभेतल्या भाषणात म्हटलं होतं. 'तीन कृषी विधेयकांचा थेट परिणाम पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. ३० हजार अडते, कृषी बाजारपेठेतील ३ लाख मजुरांना विधेयकामुळे फटका बसणार आहे,' असं बादल म्हणाले होते. तेव्हाच अकाली दल सरकारमधून बाहेर पडणार हे स्पष्ट झालं होतं.


आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं- बादल
शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि आम्ही सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करतो, असं म्हणत बादल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'लोकसभेत काँग्रेसनं केलेले आरोप निराधार आहेत. आम्ही कधीही यू-टर्न घेतलेला नाही. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या. आम्ही सगळ्या व्यासपीठांवर याबद्दल आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या समस्या, दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला त्यात यश आलं नाही,' अशा शब्दांत बादल यांनी मोदी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.

बादल यांनी संसदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना 'आत्मनिर्भर'वर जोर दिला. 'देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. पंजाबमध्ये सरकारांनी शेतमालासाठी आधारभूत किमतीचा ढाचा तयार करण्याचं अवघड काम केलं आहे. मात्र मोदी सरकारचं विधेयक या ५० वर्षांच्या तपस्येवर पाणी फिरवणारं आहे. त्यामुळे हरसिमरत कौर राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडतील,' असं बादल म्हणाले होते.

Web Title: farmers bill passed in lok sabha opposition walkout before voting union minister harsimrat kaur resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.