नवी दिल्ली: शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत. ही दोन्ही विधेयकं शेतकरी हिताची नसल्याचा आरोप करत विरोधकांनी मतदानाआधीच सभात्याग केला. काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विधेयकांवर आवाजी मतदान झालं. या विधेयकाला भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं विरोध केला. अकाली दलाच्या नेत्या हससिमरत कौर बादल यांनी विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
अकाली दलाचा विधेयकांना विरोध; कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामाकृषी विधेयकं लोकसभेत मतदानासाठी येण्यापूर्वीच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.
आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं- बादलशिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि आम्ही सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करतो, असं म्हणत बादल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'लोकसभेत काँग्रेसनं केलेले आरोप निराधार आहेत. आम्ही कधीही यू-टर्न घेतलेला नाही. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या. आम्ही सगळ्या व्यासपीठांवर याबद्दल आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या समस्या, दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला त्यात यश आलं नाही,' अशा शब्दांत बादल यांनी मोदी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
बादल यांनी संसदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना 'आत्मनिर्भर'वर जोर दिला. 'देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. पंजाबमध्ये सरकारांनी शेतमालासाठी आधारभूत किमतीचा ढाचा तयार करण्याचं अवघड काम केलं आहे. मात्र मोदी सरकारचं विधेयक या ५० वर्षांच्या तपस्येवर पाणी फिरवणारं आहे. त्यामुळे हरसिमरत कौर राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडतील,' असं बादल म्हणाले होते.