चंडीगड : पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतकरी कर्जमाफीची कायदेशीर हमी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य न केल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा बुधवारी दिल्लीकडे निघाले आहेत. याचवेळी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखण्याची तयारी केली आहे. यामुळे शेतकरी बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री घेऊन सीमेवर आले आहेत. याशिवाय बुलेटप्रूफ पोकलेन मशीनही आणण्यात आले आहे. अश्रुधुराच्या गोळ्यांचाही त्यांच्यावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.
‘चलो दिल्ली’ आंदोलनात भाग घेणाऱ्या शेतकरी नेत्यांनी एमएसपी खरेदीचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे सांगून तो फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकरी दिल्लीकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
२३ पिकांसाठी एमएसपीवर कायदेशीर हमी
खासगी कंपन्यांनी एमएसपीपेक्षा कमी दराने धान्य विकत घेऊ नये
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार ‘सी२ प्लस ५० टक्के’ची अंमलबजावणी आणि कर्जमाफी
सरकारी अहवालानुसार शेतकऱ्यांवर एकूण १८.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा करावी
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला भरपाई आणि नोकरी
सरकारने काय दिले?
५ पिकांवर एमएसपी देण्याचा प्रयत्न
यासाठी नाफेड, एनएसीसीएफशी ५ वर्षांसाठी करार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचार करू
पुढे काय होणार?
शेतकरी शंभू सीमेवर दोन दिवस थांबणार
२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
एमएसपीसाठी १.७५ लाख कोटींची गरज नाही
शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल म्हणाले की, आम्ही केंद्राच्या प्रस्तावावर तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी बोललो. त्यानंतर हा प्रस्ताव आमच्या हिताचा नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो.
एमएसपीवर कायद्याची मागणी पूर्ण झाली पाहिजे. एमएसपी देण्यासाठी १.७५ लाख कोटी रुपयांची गरज नाही.
एमएसपीवर कायदेशीर हमी मिळाल्याने, देशातील शेतकरी अर्थसंकल्पावर ओझे नसून जीडीपी वाढीसाठी ते मोठा हातभार लावत आहेत. अर्थसंकल्प पाहता एमएसपीची कायदेशीर हमी देणे शक्य नसल्याचे खोटे बोलले जात आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
अमरिंदर सिंग- पंतप्रधान भेट
भाजप नेते अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांशी संबंधित अनेक समस्यांवर चर्चा केली. सिंग यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.