चंदीगड : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांत जाऊन किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. राकेश टिकैत यांनी पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पंजाब आणि हरियाणामधील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पीकांवर ट्रॅक्टर फिरवून ती नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (farmers destroy crops as protest against farm laws in punjab haryana)
काही दिवसांपूर्वी हरियाणा येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तसेच हाती आलेल्या पीकांचा त्याग करण्यास तयार राहावे, असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले होते. राकेश टिकैत यांनी केलेल्या आवाहनानंतर येथील अनेक शेतकऱ्यांनी उभ्या असलेल्या पीकांवर ट्रॅक्टर चालवल्याची माहिती मिळाली आहे.
आता चार नाही, ४० लाख ट्रॅक्टर येणार; कायदे रद्द न केल्यास संसदेला घेराव: राकेश टिकैत
अंबाला येथे गहूचे पीक नष्ट
अंबाला येथील एका शेतकऱ्याने तयार असलेले गहूचे पीक नष्ट केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते गुलाब सिंग घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांनी आपली पीके नष्ट करू नयेत. तयार झालेली पीके गरीब किंवा गरजूंना दान करावी, असे गुलाब सिंग यांनी सांगितल्याचे समजते.
शेतकऱ्यांनी पीके नष्ट करू नयेत
काही शेतकरी आपली तयार पीके नष्ट करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर शेतकऱ्यांनी आपली पीके नष्ट करू नयेत, असे सांगण्यात आले. त्यांना समजावले गेले. पीके नष्ट करण्याची ही योग्य वेळ नाही, असेही शेतकऱ्यांना सांगितले, असे गुलाब सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शेतकरी आपल्या पीकांची मुलांप्रमाणे काळजी घेत असतात. असे असताना पीके नष्ट करणे योग्य नाही. आपल्या देशात कुपोषणाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींना तयार अन्न-धान्य द्यावे अथवा ते आंदोलनात दान करावे, असे आवाहन गुलाब सिंग यांनी यावेळी केले. दरम्यान, राकेश टिकैत यांनी ही बाब समजल्यावर उभी पीके नष्ट करू नयेत, असे आवाहन त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.