नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘असत्याग्रही’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असा आरोप करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते कृषी कायदे ते रद्द का करीत नाहीत? असा सवालही केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ऑनलाईन सर्वेक्षणासाठी लोकांना हा प्रश्न विचारत ट्विटवर सोबत चार पर्याय देत मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी पूर्वी दिलेली काही आश्वासने आणि केलेल्या विधानांचाही या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार’ , ‘ मला ५० दिवसांची मुदत द्या, नाही तर...’ २१ दिवसांत कोरोनाविरुद्ध युद्ध आपण जिंकू’ ‘ कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही , ना कोणी कोणत्याच चौकीवर कब्जा केलेला नाही, या पंतप्रधानांच्या विधानांचा उल्लेख केला. पंतप्रधान कृषी कायदे रद्द का करीत नाहीत? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी असे चार पर्यांय लोकांसाठी सूचित केले आहे. कारण ते शेतकरीविरोधी आहेत. ते भांडवलदारांचे ऐकतात, ते अहंकारी आहेत किंवा हे सर्व पर्याय बरोबर आहेत.