नवी दिल्ली: अभिनेते प्रकाश राज हे सोशल मीडियावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे. प्रकार राज भाजपचे टीकाकार आहेत, त्यामुळे त्यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्यं केलेली पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर मागील एका वर्षापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध क्षेत्रातील लोक आपले मत मांडत आहेत. याच निर्णयावर प्रकाश राज यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. 'माझ्या देशातील संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले. मी अनिता नायर यांची एक कविता वाचली होती, जी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने होती..' अशाप्रकारचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः वाचलेल्या कवितेचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
नरेंद्र मोदी काय म्हणाले ?आज सकाळी नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे'', असं मोदींनी जाहीर केलं.