समीर कुणावार यांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासावर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. याबाबत ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी दिली.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. पाऊस आला तर एकदम येतो. नाही तर चांगलीच दडी मारतो. यामुळे शेतकरी अडचणीत असताना वीज वितरण कंपनीही नेमकी शेतीला ओलित करण्याच्या वेळेतच भारनियमाच्या नावावर वीज पुरवठा खंडित करते. यामुळे दोन्ही बाजुने शेतकरी पिंजला जात आहे. काही शेतकऱ्यांनी ही बिकट परिस्थिती आ. समीर कुणावार यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिली. आ. कुणावार यांनी या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन २४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. ऐन ओलिताच्या वेळीच भारनियमन होत असल्यामुळे शेतीता पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात भारनियमन करु नये, अशी विनंती केली. ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री हिंगणघाट येथे आले असता या पत्राचे पुनश्च स्मरण करुन दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ही बाब गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. ना. बावणकुळे यांनीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले, ही बाब खुद्द ना. बावळकुळे यांनी दूरध्वनीद्वारे कळविली असल्याची माहिती आ. कुणावार यांना दिली. यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना आठवड्यातील चार दिवस दिवसा १२ तास वीज
By admin | Published: September 15, 2016 1:01 AM