दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा सुरू आहे. मोर्चामुळे नोएडाची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत, तर दुसरीकडे नोएडाच्या रस्त्यावर वाहन मोठ्या प्रमाणात थांबली आहेत. गेल्या काही तासांपासून वाहन एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाहीत. नोएडा पोलिसांनी दिल्लीशी जोडलेल्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. भरपाई आणि नोकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर शेतकरी उतरलेले आहेत. दरम्यान,आता शेतकऱ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे.
नोएडा पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. काही ठिकाणी मार्ग वळवण्यात आला असून अनेक ठिकाणी रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नोएडाहून दिल्लीकडे जाणाऱ्या डीएनडी, चिल्ला आणि कालिंदी कुंज सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पोलिस व प्रशासनाचे अधिकारी सातत्याने शेतकऱ्यांशी बोलत आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा?
पोलिसांनी आधीच शेतकऱ्यांना रोखले
नोएडा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सीमेसह किसान चौकात बॅरिअर्स लावण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहनाची योग्य तपासणी करूनच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. भारतीय किसान परिषदेने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना गुरुवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरवर पोहोचण्याचे आवाहन केले होते. बीकेपी नेते सुखबीर यादव खलिफा यांनी सांगितले की, महामाया उड्डाणपुलाच्या खाली जमल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करावे लागले. इथून शेतकरी शांततेने आंदोलन करून संसदेत पोहोचणार होते. मात्र पोलिसांनी आधीच शेतकऱ्यांना रोखले आहे.
दुसरीकडे, नोएडा पोलिस आयुक्तालयाने याआधीच शेतकऱ्यांच्या या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलीस लोकांना कुठेही जमू नये म्हणून सतत समजावून सांगत आहेत. यासोबतच पोलिसांनी सर्वसामान्य वाहनचालकांसाठी एक सूचनाही जारी केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये विकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत वाद सुरू आहे. याच्या निषेधार्थ नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. एनटीपीसीने वेगळ्या दराने भरपाई दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासोबतच नोकरी देण्याचे आश्वासनही पाळले नाही.