चंदीगड : हरियाणातील हिसार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागून भाजपचे राज्यसभा खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. बेरोजगार व मद्यपी अशा शब्दात जांगरा यांनी आंदोलकांना हिणविल्याचा आरोप होत आहे. तर रोहतक जिल्ह्यामध्ये शेतकरी आंदोलकांनी भाजपच्या काही नेत्यांना एका मंदिरात सुमारे सात तास कोंडून ठेवले.
पहिल्या घटनेत, खासदार रामचंदर जांगरा हे हिसार जिल्ह्यातील नारनौंड या शहरात एका धर्मशाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यांनी आधी काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांमुळे शेतकरी आंदोलकांचा त्यांच्यावर रोष होताच. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आंदोलक जमले व त्यांनी जांगरा यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून त्यांनी खासदाराच्या गाडीवर हल्ला केला व तिच्या काचा फोडल्या. निदर्शकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा भाजप खासदाराचा व भाजप गुंडांनी आमच्यावर हल्ला केल्याचा शेतकरी आंदोलकांचा दावा आहे.
या घटनेत शेतकरी नेते रवी आझाद व शेतकरी कुलदीप राणा जखमी झाले असून, त्यांना हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र कुलदीप राणा नाल्यात पडल्यामुळे जखमी झाले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. जांगरा यांच्या गाडीची नासधूस केल्याबद्दल दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत रोहतक जिल्ह्यामधील किलोई गावामध्ये भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना एका मंदिरामध्ये सात तास कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे. उत्तराखंड येथील केदारनाथला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी हे नेते किलोई गावातील एका मंदिरात जमले होते. हे कळताच शेतकरी आंदोलकांनी मंदिराला घेराव घातला. (वृत्तसंस्था)
नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाकिलोई गावात कोंडून ठेवलेल्या भाजप नेत्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा केली. भाजप नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांना मंदिरातून बाहेर येऊ देण्यात आले, असा दावा शेतकरी आंदोलकांनी केला.