- विकास झाडे नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तर उद्या शनिवारी देशभरातील टोल नाके मुक्त करण्याचा आणि दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी पंजाबच्या विविध भागांतून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. तसेच दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांत टोल नाके व रस्ते बंद करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काही ठिकाणी रेल रोकोही केला जाईल, असे कळते.आतापर्यंत सरकारकडून आलेले प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळले आहेत. कोरोना असो वा कडाक्याची थंडी, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय जराही हटणार नाही, असा शेतकऱ्यांनी आज पुन्हा संकल्प केला आहे. भारतीय शेतकरी संघटनेने (भानु) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सामान्य लोकांचा विचार करून आंदोलन मागे घ्या. चर्चेने सगळ्याच गोष्टी सुटतील, अशी विनंती पुन्हा केली. परंतु शेतकऱ्यांनी या प्रस्तावाबाबत अधिकृत काहीही कळविले नसल्याचे म्हटले आहे. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात पलवल येथून शेतकरी येत असताना बदरपूर सीमेवर कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली. नोएडा येथे दलित प्रेरणास्थळावरही अनेक शेतकऱ्यांनी धरणे दिले आहे. आज येथून तिन्ही कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि प्रतीकात्मक दहन केले. शनिवारी यानिमित्ताने ११ शेतकरी मुंडण करून सरकारचा निषेध करणार आहेत. शुक्रवारी भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकेत यांनी उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर केलेल्या भाषणात शेतकऱ्यांना सांगितले की, आंदोलनात काही असामाजिक तत्त्व येऊ शकतात. त्यांच्यामुळे आंदोलनाला गालबोट लागू शकते. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलन आता बराच काळ चालणार आहे. शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नकाशरद पवार यांचा सल्लाशेतीविषयक कायद्यांविषयी केंद्र सरकारने पुनर्विचार करावा. केंद्राने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तूर्त हे आंदोलन दिल्लीपुरता मर्यादित आहे. योग्य वेळी निर्णय घेतल्यास आंदोलन इतरत्र पोहोचेल, असेही ते म्हणाले.धर्मेंद्रने वेधले लक्ष! चित्रपट अभिनेता धर्मेंद्र यांनीही ट्विट करीत शेतकऱ्यांच्या यातनांमुळे दु:ख होत असल्याचे सांगितले. सरकारने तातडीने यावर मार्ग काढावा, असे सुचविले....तर राजीनामा देणार! हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना आधारभूत मूल्य मिळायला पाहिजे. मी ते मिळवून देईल. त्यात अपयश आले तर पदाचा राजीनामा देईन, असे जाहीर केले.
शेतकरी आज करणार महामार्ग जाम आंदोलन! पंजाबहून हजारोंची दिल्लीकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:21 AM