दक्षिण कर्नाटक - बेडकीहाळ-तळगता रस्त्याच्या पूर्वभागातील एका शेतात तब्बल 12 एकर ऊस जळून खाक झाला. कल्याणबाळ मळा परिसरातील तीन शेतकऱ्यांचा मिळून एकूण 12 एकर ऊस डोळ्यादेखत जळाल्याने शेतकऱ्यांची जावाची खालमेल झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेला घास आगीत भक्ष्य झाला आहे. श्रीपादराव इनामदार यांचा 6 एकर, रविंद्र इनामदार यांचा 3 एकर आणि आण्णासाहेब खोत यांचा 3 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला.
मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतात शार्ट सर्कीट झाल्याने ठिणग्या पडल्या. त्यानंतर, आगीने चांगलाच पेट घेतल्याने शेतातील तब्बल 12 एकर ऊस जळाला आहे. त्यामध्ये तब्बल 5 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती होताच परिसरातील शेतकऱ्यांना बाजूला लागून असलेला ऊस तोडला. त्यामुळे शेतातीर इतर पिकांची मोठी हानी होण्यापासून वाचता आले. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले होते. मात्र, शेतात जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने दलाची गाडी जळत असलेल्या शेतापर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे, उभ्या डोळ्यांदेखत ऊस जळाल्याने शेतकऱ्यांच्या जावीची घालमेल झाली.
शेतातील जळालेल्या ऊसाचा महसूल निरीक्षक एस.एन. नेम्मनवार यांनी पंचनामा केला आहे. या शेतातील ऊस पंचगंगा साखर कारखाना, इचलकरंजी, जवाहर साखर कारखाना हुपरी, आणि दत्त साखर कारखाना शिरोळ येथे नोंद करण्यात आल्याने याच कारखान्यांना काही दिवसांतच जाणार होता. मात्र, ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण मोठ्या प्रमाणात ऊस जळाला.