हिसार : मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी हरयाणात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. (Police Lathicharge On Farmers Who Were Protesting Against CM Manohar Lal Khattar)
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी पानिपत आणि हिसार या शहरांमध्ये 500 खाटांची क्षमता असलेल्या दोन कोरोना रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले. हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते, पण शेतकरी थांबले नाहीत. ते मुख्यमंत्र्याच्या दिशेने जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
अनेक शेतकरी जखमीशेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि मोठ्या संख्येने रुग्णालयाकडे कूच करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरूग्राममध्ये दोन रुग्णालयांचे उद्धाटनमुख्यमंत्र्यांनी गुरुग्राममध्ये आणखी दोन रुग्णालयांचे - 100 खाटांचे फील्ड रुग्णालय आणि 300 खाटांचे कोरोना केअर सेंटरचे उद्धाटन केले. दरम्यान, पानिपत येथे रिफायनरीजवळ तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे नाव गुरु तेग बहादूर संजीवनी कोविड रुग्णालय ठेवले आहे. या रुग्णालयासाठी 25 डॉक्टर आणि 150 पॅरामेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना माघारी जाण्याचे आवाहनदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना साथीच्या रोगामुळे घरी परतण्यासाठी आणि कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की परिस्थिती सामान्य राहिल्यास शेतकरी आंदोलन करू शकतात.
26 मे रोजी काळा दिवस साजरा करणार मोदी सरकारने आणलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आता 26 मे रोजी दिल्ली सीमेवर काळा दिवस साजरा करण्याची तयारी करत आहेत. या दिवशी शेतकरी आंदोलनाला 6 महिनेही पूर्ण होत आहेत. यामुळे शेतकरी संघटनांनी या दिवशी शेतकऱ्यांसोबत काळा दिवस साजरा करण्याविषयी तसेच सरकारविरोधात रोष व्यक्त करण्याविषयी चर्चा केली आहे.