नवी दिल्ली: मागील एका वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आज तीनही कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर विविध नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी संवाद साधताना तोमर म्हणाले, "पंतप्रधानांनी संसदेत मंजूर केलेली 3 विधेयके आणली होती. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला असता. हा कायदा आणण्यामागे पंतप्रधानांचा क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा स्पष्ट हेतू होता. पण हे नवीन कायदे शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही अयशस्वी झालो याचे मला दुःख आहे,''असे ते म्हणाले.
कृषिमंत्री पुढे म्हणाले, "देश या गोष्टीचा साक्षीदार आहे की, 2014 मध्ये जेव्हापासून पंतप्रधान मोदींनी सरकारची सूत्रे हातात घेतली, तेव्हापासून त्यांच्या सरकारची बांधिलकी शेतकरी आणि शेतीसाठी आहे. तुम्ही हे पाहिले असेल, गेल्या 7 वर्षात शेतीला लाभ देणाऱ्या अनेक नवीन योजना सुरू झाल्या. केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. त्याचा फायदाही अनेक ठिकाणी दिसून आला आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी जी बंधने आहेत ती खुली व्हावीत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही कृषी कायदा आणला होता. परंतु काही शेतकऱ्यांना हे कायदे समजावून सांगण्यात आम्हाला यश आले नाही आणि ते रद्द करावे लागले,'' असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले ?आज सकाळी नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे'', असं मोदींनी जाहीर केलं.
शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली- राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करुन आपली भावना व्यक्त केली. देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा... असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, राहुल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकऱ्यांसोबत असून पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तर, सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते.