पेटलावद : पाकिस्तानात टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदच्या 150 हून अधिक शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्विटर आणि पोस्टाद्वारे संदेश पाठविला असून यामध्ये पाकव्याप्त काश्मीर द्या आणि आमचे टोमॅटो देऊन जा, असे म्हटले आहे. याशिवाय, 2008मध्ये झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने माफी मागावी, असेही या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यासंबंधी ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा शेतकऱ्यांनी केले आहे.
वाघा बॉर्डरवरून आपल्या देशात टोमॅटो जात होते. मात्र, दहशतवादी आणि आपल्या सैनिकांनी आमच्या देशातील निर्दोष लोकांवर हल्ला केला. दहशतवाद पसरवला. 26/11 आणि पुलवामा यासारखे हल्ले केले. यानंतर आमच्या देशाने आणि आम्ही आपल्याला टोमॅटो निर्यात न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दोन दिवसांत आपल्या देशात टोमॅटोवरून खराब परिस्थिती निर्माण झाल्याचे मीडियाच्या माहितीनुसार समजले. जर, पाकिस्तान भारताच्या शत्रुंना आमच्या सरकारकडे सोपविले आणि पाकव्याप्त काश्मीर शांतिपूर्वक भारताकडे सोपविल्यास भारतीय शेतकरी युनियन टोमॅटो पाठवण्यासंदर्भात विचार करेल, असे ट्विटरच्या माध्यमातून भारतीय शेतकरी युनियनच्या झाबुआ जिल्हा संघटनेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला आहे. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून टोमॅटो 300 रुपये प्रति किलो विकला जात होता. पण आता या किंमतीत वाढ होऊन 400 रुपये झाल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे.