नवी दिल्ली : उत्तर प्रदेशहून शेतकऱ्यांचे दिल्लीकडे प्रस्तावित कूच आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. ग्रेटर नोएडा, नोएडा आणि यमुना प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर शेतकरी नेत्यांची हा निर्णय घेतला.
शेतकरी नेत्यांनी सांगितले की, दलित प्रेरणा स्थळावर एक आठवडा वाट बघण्यात येईल. या काळात मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर पुन्हा दिल्लीकडे मार्गक्रमण करण्यात येईल. त्यानंतर नोएडा एक्स्प्रेस-वे वरून बॅरिकेडिंग हटविण्यात आली आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. त्यापूर्वी सोमवारी दुपारी १२ वाजता शेतकरी मोठ्या संख्येने नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरवर गोळा होण्यास सुरुवात झाली. संसदेला घेराव करण्यासाठी शेतकरी कूच करणार होते. पोलिसांनी त्यांना दलित प्रेरणा स्थळावर रोखले. त्यानंतर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
चिल्ला सीमेवरील बॅरिकेडिंग ताेडले
पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली-यूपीला जोडणाऱ्या चिल्ला सीमेवर बॅरिकेडिंग केले होते. शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडले.
नोएडा एक्स्प्रेस-वे दोन्ही बाजूंनी बंद केल्यामुळे आणि वाहनांची तपासणी सुरू असल्याने
५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात १०% प्लॉट देण्यात यावे.
६४.७ टक्के दराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी.
नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार, बाजारभावाच्या चारपट नुकसानभरपाई मिळावी.
अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना रोजगार व पुनर्वसनाचे सर्व फायदे मिळावे.