शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात शंभू सीमेवर संघर्ष सुरू आहे. आपल्या मागण्या घेऊन दिल्लीला जाण्याच्या निर्णयावर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी पोलीस वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत. याचाच एक भाग म्हणून, या शेतकरी आंदोलकांवर अश्रुधूर सोडण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. मात्र, पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये शेतकरी पतंगाच्या सहाय्याने ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत.
अश्रुधूर सोडण्यासाठी ड्रोनचा वापर -पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले आहेत. विविध मागण्यांसंदर्भात केंद्रावर दबाव आणण्यासाठी ते दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी मंगळवारी त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे सोडण्यासाठी एक ड्रोन तैनात केले होते. यातच, या ड्रोनच्या सहाय्याने पंजाब परिसरात आपल्यावर अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला. मात्र, या ड्रोनवरचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी खास जुगाड शोधून काढला आहे. त्यांनी पतंग उडवायला सुरुवात केली आहे. यानंतर ड्रोनला तेथून माघार घ्यावी लागली आहे.
सरकारसोबत चर्चेची तिसरी फेरी होणार -दुसरीकडे, गुरुवारी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. यात सरकारकडून तीन केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. मात्र, सरकारच्या दबावाला आपण बळी पडणार नाही आणि आपल्या सर्व मागण्या सरकारला मान्य करायलाच लावणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. शेतकरी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकरी कर्जमाफी, पोलिस खटले मागे घ्यावेत आणि लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना 'न्याय' मिळावा, आदी मागण्या शेतकरी करत आहेत.