-विकास झाडेनवी दिल्ली : सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाचा मृतदेह तीन निषेध स्थळाच्या स्टेजच्या मागे बॅरिकेडवर बांधलेला होता. निहंगांनी त्यांची हत्या केली, असा आरोप आहे.तरुणाचा तोडलेला हात मृतदेहाशी बांधला होता. अंतर्गत वादामुळे ही घटना घडली असल्याचा संशय आहे. मृताचे नाव लखबीर सिंग हरनाम सिंह (३५) असून पंजाबचा आहे. त्याला तीन मुली आहेत. त्याची पत्नी मुलींसह वेगळी राहत आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा निहंगांनी तेथे गोंधळ घातला. मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी दिली जात नव्हती. नंतर शेतकरी नेते आले आणि त्यांनी मृतदेह काढला.
लखबीर सिंगवर आरोप आहे की, त्याने श्री गुरुग्रंथ साहिबचा अवमान केला. तो रात्रीच्या वेळी तंबूमध्ये आला. श्री गुरुग्रंथ साहिब घेऊन तो पळू लागला तेव्हा लोकांनी त्याला पकडले. जखमी लखबीरला दोरीने बांधून ओढत नेले. निहंगांचा आरोप आहे की, लखबीरला कारस्थानांतर्गत ग्रंथाचा अवमान करण्यासाठी पाठविले होते.
‘आमचा संबंध नाही’या हत्येची निहंग गटाने जबाबदारी घेतली आहे. या हत्येचा संयुक्त किसान मोर्चाने निषेध केला. बलबीरसिंग राजेवाल, डॉ. दर्शन पाल, गुरनामसिंग चधुनी, हन्नान मोल्ला, जगजितसिंग डल्लेवाल, जोगिंदरसिंग उग्रहन, शिवकुमार शर्मा, युधवीर सिंग, योगेंद्र यादव यांनी सांगितले की, निहंग वा मृताचा किसान मोर्चाशी संबंध नाही. आम्ही कोणत्याही धार्मिक ग्रंथाच्या किंवा चिन्हाच्या अपमानाच्या विरोधात आहोत; परंतु या आधारावर कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही.