नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदाेलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी हाेणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदाेलन हाेणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे.दिल्लीच्या सीमेवर दाेन महिन्यांहून अधिक कालावधीपासून शेतकरी आंदाेलन सुरू आहे. त्यावर ताेडगा न निघाल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदाेलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशव्यापी चक्का जाम आंदाेलन करण्यात येणार आहे. राकेश टिकैत यांनी सांगितले, जे शेतकरी दिल्लीला येऊ शकले नाहीत, त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदाेलन करावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच खासगी वाहनातून काेणी आजारी व्यक्ती जात असल्यास अशा वाहनांना राेखणार नसल्याचे टिकैत यांनी सांगितले आहे. चक्का जाम आंदाेलनाबाबत काेणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील पाेलीस सतर्क आहेत....तर देशासमोर मोठे संकट -शरद पवारशेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार असंवेदनशील भूमिका घेत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. भव्य बॅरिकेडस्, तारा आणि रस्त्यावर खिळे ठोकण्यावरून त्यांनी सरकारची निंदा केली. ब्रिटिशांच्या राजवटीतदेखील असे झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात रस नाही, अशी टीका त्यांनी केली.
Farmers Protest : शेतकऱ्यांचा आज तीन तास चक्काजाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 8:29 AM