नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर जसा जसा वाढत गेला तसं याठिकाणी गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनात बसलेले शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. गेल्या अनेक महिन्यापासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी जोवर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहील असा दावा केला. परंतु सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे.
यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परंतु सुरूवातीच्या काळात जे टेंट लावले होते ते तसेच आहेत. यातील बहुतांश टेंट रिकामे आहेत. यूपी गेट येथे २८ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू होतं. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते.
यूपी गेट परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १०० शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात. त्यामुळे टेंट रिकामेच पडले आहेत. रिकामे टेंट असूनही नेते ते हटवत नाहीत. त्यामुळे केवळ टेंटच्या सहाय्याने शेतकरी आंदोलन सुरू असल्याचं दिसून येते.
एमएसपीवर कायदा होईपर्यंत थांबणार
"जो पर्यंत हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि एमएसपीवर कायदा तयार केला जात नाही तोवर आंदोलक शेतकरी आपलं आंदोलन स्थगित करणार नाहीत. सर्व शेतकरी सीमेवर बसून राहतील. सरकारनं कोणत्याही चुकीच्या समजूतीत राहू नये आणि त्यांचं आदोलन दीर्घ कलावधीसाठी चालणार आहे,असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.
"जरी लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत," असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.