नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. अशा परिस्थितीत सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन पूर्वीपेक्षा अधिक बळकट होत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या सीमेवर लंगर आणि तंबू रिकामे असूनही आंदोलनाला अधिक गर्दी होत असल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत. आंदोलनाला बळ देण्यासाठी गर्दी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे (पंजाब) अवतार सिंग मेहमा यांनी "गर्दी अजिबात कमी झालेली नाही. आम्ही फक्त पंजाब आणि हरियाणामध्येच नव्हे तर इतर राज्यातील खेड्यात आणि जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा वाढवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंजाबमध्ये लाट निर्माण करण्यास काही महिने लागले. तर देशात अशा प्रकारचे प्रभाव निर्माण होण्यास थोडा अधिक वेळ लागेल. पण आमच्या आंदोलनाचा वेग कमी झालेला नाही. आमच्या दृष्टीकोनातून हे आंदोलन दिवसेंदिवस मजबूत होत आहे" असं म्हटलं आहे. तसेच अनेक शेतकरी घरून परत येत आहेत. ते थोड्या काळासाठी घरी जातात आणि नंतर परत येतात. कारण त्यांना शेतीची कामेही सांभाळावी लागतात. तरीही सीमेवरील आंदोलकांची संख्या स्थिरच आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
""चक्का जाम" नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा"
"18 फेब्रुवारीच्या "चक्का जाम" नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या सीमेवर संख्या स्थिर ठेवण्यासाठी रणनीती आखत आहे. यामुळे आंदोलकांना घरकामाचे व्यवस्थापन करता येईल. पण सीमेवर लोकांची संख्या 18 फेब्रुवारी नंतरच वाढेल. लवकरच, आम्ही देशभरातील शेतकऱ्यांनाही दिल्लीतल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहोत" असं देखील अवतार सिंग मेहमा यांनी म्हटलं आहे. जेव्हा मी महापंचायतीसाठी करनालला गेलो होतो, तेव्हा सिंघूमधील अनेक लोक माझ्याबरोबर होते आणि ते पुन्हा परत आले. आम्ही राजस्थानमधील सीकर आणि पूर्व उत्तर प्रदेशातील बर्याच भागातील लोकांना देखील एकत्रित करत आहोत. पण ही तात्पुरती परिस्थिती आहे. 18 फेब्रुवारी नंतर पुन्हा गर्दी होईल असं भारतीय किसान युनियन एकताचे (दकौदा) सरचिटणीस जगमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
".... ते फक्त एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात आहेत"
बीकेयू (लखोवाल) सरचिटणीस परमजीत सिंग यांनी "लोकांना महापंचायतीत सहभागी व्हायचे आहे. खासकरुन राकेश टिकैतसारखे नेते सांगत असल्याने ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातात. पण याचा अर्थ असा नाही की ते माघारी जात आहेत. ते फक्त एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात आहेत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू असंही ते म्हणाले.
"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"
पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. राकेश टिकैत यांनी "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे. शेतकरी आणि आपल्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकरी नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. त्यावर देखील राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं. आम्ही कोणाशी चर्चा करायची. आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही.