Farmers Protest: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन तीव्र झाले आहे. शेतकरी बॅरकेड्स तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. केंद्रातील एनडीए सरकार अडून बसले आहे, त्यामुळे आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. पहिला- शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा, दुसरा- शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्याची परवानगी द्या.
संयमाचा अंत पाहू नका...पंजाब-हरियाणाला लागून असलेल्या शंभू सीमेवर बुधवारी (21 फेब्रुवारी, 2024) सकाळी पत्रकार परिषदेदरम्यान डड्डेवाल म्हणाले, 'शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये.'
सरकारने MSP चा कायदा करावा- पंढेरशेतकरी नेते पंढेर म्हणाले की, आम्हाला जेव्हा-जेव्हा चर्चेचे निमंत्रण आले, तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. हात जोडून आम्ही केंद्र सरकारला आमच्यासोबत बसून आमचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली. प्रत्येक मागणीवर चर्चा झाली, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. केंद्र सरकारच्या प्रमुखांनी पुढे एमएसपी कायदा करण्यास तयार असल्याचे सांगितल्यावर परिस्थिती शांत होऊ शकते.'
अडीच लाख कोटी जास्त नाही...'देशातील शेतकरी आईंची मुले आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या बाजूने शांत राहणार आहोत. मात्र, निमलष्करी दलांना आमच्या रक्ताची होळी खेळायची आहे. हा देश सर्वांचा आहे, पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. 1.5 किंवा 2.5 लाख कोटी रुपये सरकारसाठी जास्त नाहीत. देशातील 80 टक्के लोकसंख्या या पैशावर अवलंबून आहे. आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे. आमच्या बाजूने कोणताही हल्ला होणार नाही,' असेही पंढेर यावेळी म्हणाले.