शेतमालाला हमीभावासह केंद्र सरकारसोबत चार वेळा झालेली चर्चा कुठल्याही तोडग्याविना समाप्त झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे. आंदोलक करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्याल आलेले बॅरिकेड्स आणि अडथळे दूर करण्यासाठी आंदोलकांकडून जेसीबी आणि पोकलेन मशीन आणल्या आहेत.
आज जवळपास १४ हजार शेतकरी सोबत आणलेल्या १२०० ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. पंजाबच्या डीजीपींनी सर्व रेंजचे एडीजी, आयजीपी आणि डीआयजी यांना पत्र लिहून कुठल्याही परिस्थितीत जेसीपी, पोकलेन, टिपर, हायड्रा अशा अवजड वाहनांना हरियाणाच्या खनौरी आणि शंभू बॉर्डरच्या दिशेने पुढे येऊ देऊ नका, अशे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना अवजड यंत्रे उपलब्ध करून देणाऱ्यांना सक्त ताकिद दिली आहे. आंदोलकांना यंत्रसामुग्री उपलब्ध करून देऊ नका, ही यंत्रे आंदोलन स्थळावरून हटवा. यांचा वापर सुरक्षा दलांचं नुकसान करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच असं करणं हा अजामिनपात्र गुन्हा आहे, अशा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पिकांना किमान हमिभाव म्हणजेच एमएसपी मिळावा, त्यानुसार खरेदी व्हावी यासाठी केंद्र सरकारने दिलेली ऑफर शेतकरी आंदोलकांनी फेटाळून लावले होते. दरम्यान, आंदोलन शेतकऱ्यांनी जेसीबी, पोकलेन मशीन आणल्या असून, या शंभू बॉर्डर आणि खनोरी बॉर्डरवरून ही यंत्रे अडवून जप्त करण्याची मागणी हरियाणा पोलिसांच्या डीजीपींनी पंजाबच्या डीजीपींना पत्र लिहून केली आहे.
यादरम्यान, हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मार्चच्या पार्श्वभूमीवर ७ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि एसएमएसच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवेवर घातलेली बंदी बुधवारपर्यंत वाढवली आहे. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिसरा या भागांना इंटरनेट बंदीचा मोठा फटका बसला आहे.