नवी दिल्ली: पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांपासून थांबवण्यात आला आहे. मात्र आज आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
आज शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यातही चर्चा होणार आहे. शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये रेल रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्या रेल्वे मार्गांवर आज गाड्या थांबवण्यात येणार आहेत. त्यात भटिंडा-बरनाळा मार्ग, लुधियाना-जाखल-दिल्ली मार्ग, राजपुरा-दिल्ली मार्ग आणि अमृतसर फतेहगढ साहिब मार्गाचा समावेश आहे. बुधवारीच शेतकरी संघटनेने गुरुवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.
शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा पाहता टिकरी सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. अशा स्थितीत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयासाठी लोक पायीच घराबाहेर पडत आहेत. इतकेच नाही तर मेट्रोने प्रवास करणारे लोकही चिंतेत आहेत कारण मेट्रोतून उतरल्यानंतर लोकांना रिक्षा उपलब्ध होत नाहीय.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याशिवाय सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. बुधवारी शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये आज रेल रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये आजही मोबाईल इंटरनेटवर बंदी
हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात आजही मोबाईल इंटरनेटवर बंदी राहणार आहे. याशिवाय २२ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू आहे. शेतकऱ्यांच्या २५०० ट्रॅक्टर ट्रॉली शंभू सीमेवर पोहोचल्या आहेत. त्यापैकी ८०० ट्रॉलीमध्ये खाद्यपदार्थ, लाकूड आणि पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात आहेत. सहा महिन्यांपासून 'दिल्ली चलो' मोर्चासाठी शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत.