दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स हटवल्यानंतर शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याची शक्यता आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय किसान यूनियन एकता सिद्धपूरचे अध्यक्ष जगदीप सिंग दलेवाल यांनी, शेतकरी दिल्लीमधील जंतर मंतर किंवा रामलीला मैदानामध्ये आपलं आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करतील, असे संकेत दिले आहेत.
शेतकरी केंद्र सरकारविरोधात पिकांच्या हमीभाव भावाची गॅरंटी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. हे आंदोलक फेब्रुवारी महिन्यापासून हरियाणाच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. फेब्रुवारी महिन्यात या आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली होती.
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीमेवर लावलेले बॅरिकेट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाकेबंदीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत असल्याचं विधान केलं होतं. दरम्यान, हरियाणा सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता या प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.