पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. हरियाणाचे सब इन्स्पेक्टर हिरालाल असं या पोलिसाचं नाव आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल हे 52 वर्षांचे होते आणि त्यांना शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आलं होतं. शंभू बॉर्डर पंजाबमधील पटियाला येथे आहे. सब इन्स्पेक्टर हिरालाल हरियाणाच्या सीमावर्ती भागात तैनात होते.
एएनआयच्या वृत्तानुसार, ड्युटीवर असताना सब इन्स्पेक्टर हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. येथील डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. उपचारादरम्यान हिरालाल यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'च्या घोषणेवेळी त्यांना शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आलं होतं.
हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांनी सब इन्स्पेक्टर यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. कपूर म्हणाले, हिरालाल यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक बजावलं आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाचं मोठं नुकसान झालं आहे. शंभू बॉर्डरवर एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला तेव्हाच हिरालाल यांचा देखील मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे.
78 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
शंभू बॉर्डरवर मित्रांसोबत ट्रॉलीमध्ये झोपलेल्या 78 वर्षीय ज्ञान सिंह यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या रुग्णवाहिकेतून पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथून डॉक्टरांनी त्यांना पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञान सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'दिल्ली चलो' मोर्चात सहभागी होण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी शंभू बॉर्डरवर आले होते.