सिकर (राजस्थान) : कृषी कायदे रद्द करायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी चलो दिल्लीचा नारा दिला जाईल. त्यावेळी देशातील लाखो शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीत येतील आणि संसदेला घेराव घालतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राजस्थानातील शेतकरी महापंचायतीमध्ये दिला.
दिल्लीच्या सीमांवरील रॅलीमध्ये चार लाख ट्रॅक्टर सहभागी झाले होते. आता शेतकरी व ट्रॅक्टर शेतांमध्ये आहेत. त्यामुळे सीमांवर संख्या कमी दिसत आहे. पण शेतकरी रस्त्यावर उतरतील, तेव्हा सोबत ४० लाख ट्रॅक्टर पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, २३ मार्चपासून उपोषण आणि संसदेला घेराव हाच आमच्या पुढील आंदोलनाचा भाग असेल.
शेतकरी यापुढे इंडिया गेटपाशीच शेतीसाठी पेरणी सुरू करतील. संसदेला घेराव कधी घालायचा, हा निर्णय सर्व शेतकरी संघटनांच्या बैठकीत घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे केवळ नाटक केंद्र सरकार करीत आहे. चर्चेला ज्या मंत्र्यांना पाठविण्यात येत होते, त्यांना कसलेच अधिकार देण्यात आले नव्हते.
... तर सरकारच कोसळेल
यापुढे उत्तर प्रदेशबरोबरच सर्व राज्यांमध्ये शेतकरी पंचायती व मेळावे घेण्यात येतील. देशात सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यात येईल, असा इशारा नरैश टिकैत यांनी उत्तर प्रदेशातील एका सभेत बुधवारी दिला. शेतकरी रस्त्यावर उतरले, तर सरकारच कोसळेल, असा इशारा याआधी राकेश टिकैत यांनी दिला होता.