नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. जाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर बुधवारी (21 फेब्रुवारी) सकाळी दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. आमच्या मागण्या लवकर मान्य करा अन्यथा दिल्लीत येऊन चक्काजाम करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जवळपास 177 सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्स काही काळासाठी बंद केली आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) 14 आणि 19 फेब्रुवारी रोजी हे आदेश जारी केले होते. गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत ही अकाऊंट्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखता यावी यासाठी काही सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्स काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत.
भारत सरकारच्या आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, कोणत्याही वेबसाइट्स किंवा सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती लोकांसाठी बंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. या कायद्यानुसार जून 2020 मध्ये सरकारने अनेक चिनी वेबसाइट बंद केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट्स आणि वेबसाइट्सच्या लिंक्स बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही अकाऊंट्स काही काळासाठीच बंद करण्यात आली असून, शेतकऱ्यांचा विरोध संपल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत चार बैठका झाल्या. या बैठकांमध्ये केंद्राने शेतकऱ्यांसमोर काही प्रस्ताव ठेवले. मात्र, हे प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी अमान्य केले. सरकारसोबत आता चर्चा करण्यात काही तथ्थ नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी आजपासून (बुधवार) दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची तयारी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे टाकले आहेत. मात्र, हे कठडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो जेसीबी आणि पोकलेन मशीन सोबत ठेवल्या आहेत.