नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढलं. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.
संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयातील भाजपाचे झेंडेही जाळले
भाजपा आमदाराच्या अंगावर शाई फेकल्यानंतर पोलीस आणि भाजपा कार्यकर्ता नारंग यांना एका दुकानात घेऊन गेले. मात्र नंतर आमदार नारंग दुकानाबाहेर आल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी या आमदाराचे कपडे देखील फाडले. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. यात पोलीस नारंग यांचा शेतकऱ्यांपासून बचाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत शेतकरी आमदाराला शिव्या देताना आणि मारहाण करतानाही दिसत आहेत. याशिवाय या संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयातील भाजपाचे झेंडेही जाळले.
भाजपा आमदारासोबत भाजपाच्या इतर दोन नेत्यांनाही मारहाण
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी भाजपा आमदारासोबत भाजपाच्या इतर दोन नेत्यांनाही मारहाण केली. त्यानंतर पोलीस पुन्हा भाजपा नेत्यांना एका दुकानात घेऊन गेले. काही वेळेने पोलिसांनी त्यांना दुकानाच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी पोहचवलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धक्काबुक्कीत एका पोलीस अधिकाऱ्यालाही सौम्य जखम झाल्याचं सांगितलं जातंय. हा सर्व प्रकार जवळपास 1 तास सुरू होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भारतीय किसान युनियनमधील नेते भानू प्रताप सिंह (Bhanu Pratap) यांनी संघटनांवर गंभीर आरोप केला आहेत. या आंदोलनाला काँग्रेसचं (Congress) फंडींग आहे असं म्हटलं आहे. भारतीय किसान युनियनमधील गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी मोठा आरोप केला. "सिंघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या विविध शेतकरी संघटना या काँग्रेसने विकत घेतलेल्या आहेत. 26 जानेवारीला आम्हाला हे माहिती पडलं. हे सर्व काँग्रेसने विकत घेतलेले आणि त्यांनी पाठवलेले होते. 26 जानेवारीला त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. लाल किल्ल्यावर दुसरा झेंडा लावला. त्याच दिवशी आम्ही ठरवलं. यांच्यासोबत राहायचं नाही आणि आम्ही परतलो" असं भानू प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे.