नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. मात्र नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मंच अचानक तुटला. राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेते या मंचावर उपस्थित होते. मात्र मंच तुटल्याने ते खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्याचवेळी अचानक मंच कोसळला आणि थोडा गोंधळ निर्माण झाला. काही वेळातच मंच व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात असं म्हणत टिकैत यांनी भाषणाला जोरदार सुरुवात केली. "जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
"शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक ही लाजिरवाणी गोष्ट"; हरसिमरत कौर बादल संतापल्या, म्हणाल्या...
अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या खिळे असलेल्या सुरक्षेवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती लाजिरवाणी गोष्ट आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे. "शेतकरी आंदोलनस्थळाला ज्या पद्धतीनं बालेकिल्ल्याचं स्वरुप दिलं गेलंय, ते पाहून मला या सरकारचं केवळ आश्चर्य वाटतं आहे. रत्यावर बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत, खिळे ठोकले गेलेत इतकंच नाही तर पोलिसांना लोखंडी हत्यारं देण्यात आली आहेत जणू काही सीमेवर पाकिस्तानी उभे आहेत. ही तुमचीच जनता आहे. तुमचेच शेतकरी आहेत, ज्यांना तुम्ही अशा पद्धतीनं वागवत आहात" अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे.
"शेतकरी दारात येऊन उभे आहेत अन् मोदी अजूनही एका फोन कॉलवर..., हे अत्यंत दुर्दैवी"
पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी आपण फक्त एक फोन कॉल दूर आहोत असं म्हटलं होतं. त्यावरून हरसिमरत यांनी टोला लगावला आहे. "शेतकरी दारात येऊन उभे आहेत आणि पंतप्रधान अजूनही एका फोन कॉलवर आहेत, हे दुर्दैवी आहे" असं हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. फजिल्काच्या जलालाबादमध्ये मंगळवारी स्थानिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या दोन पक्षांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.