शेतकऱ्यांचा संसदेवर धडक देण्याचा ट्रॅक्टर मोर्चा रद्द
- विकास झाडे नवी दिल्ली : संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर ही एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संंयुक्त किसान मोर्चाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर मार्च ६ डिसेंबरपर्यंत ढकलण्यात आला. वीजबिल आणि पराळी जाळण्याचा दंडही रद्द करावा. शहीद शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, देशभर शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत. लखीमपूर खेरी घटनेतील दोषीला मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. एमएसपीचा मुद्दा त्वरित सोडवावा, असे म्हटले आहे.
आम्ही आघाडी जिंकली, आज सरकारकडून काही निवेदने आली आहेत, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आम्ही वाट पाहत आहोत. २९ तारखेला संसदेवर मोर्चा काढणार नाही. सरकारला आमच्याशी चर्चा करावी लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वाससोमवारी संसदेकडे जाणारा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वास्तविक, संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आंदोलकांचा ट्रॅक्टर मोर्चा रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर होते.