Farmers Protest Chalo Delhi March: पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. यातच शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. किसान मोर्चाने याबाबतची माहिती दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना सरबन सिंग पंढेर यांनी खनौरी सीमेवर ही माहिती दिली. ‘चलो दिल्ली मार्च’संदर्भातील पुढील रणनीती २९ फेब्रुवारीला ठरवली जाईल. आम्ही सर्व दुःखी आहोत, आमचा तरुण शेतकरी शुभकरण सिंग याला आपला जीव गमावावा लागला.२४ फेब्रुवारीला रोजी आम्ही कँडल मार्च काढू, असे सरबन सिंग पंढेर यांनी सांगितले.
२९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करू
२६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेची बैठक आहे. २५ फेब्रुवारी रोजी आम्ही शंभू सीमा आणि खनौरी सीमा या दोन्ही ठिकाणी WTO चा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होत आहे यावर चर्चासत्र आयोजित करू. डब्ल्यूटीओ शेतकऱ्यांसाठी किती वाईट आहे यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कृषी क्षेत्रातील जाणकारांना बोलावणार आहोत. २७ फेब्रुवारीला शेतकरी संघटनांची बैठक घेणार आहोत. २९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करू, अशी माहिती सरबन सिंग पंढेर यांनी दिली.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्युबद्दल खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. खनौरी सीमेवरील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २१ वर्षीय शुभकरण सिंग याने शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील होण्यासाठी घर सोडले. चकमकीत तो मारला गेला. त्याच्या कुटुंबीयाना सरकारने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शवविच्छेदन रोखून धरले.