नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येनंतर निहंग समूह चर्चेत आहे. दरम्यान, मंगळवारी निहंग समुहाचे प्रमुख बाबा अमन सिंग यांचा एक कथित फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत दिसत आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने त्यांना आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप बाबा अमन सिंग यांनी केला आहे. तर या फोटोंमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असे विधान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केले आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ज्या फोटोमुळे गोंधळ उडाला आहे. त्यामध्ये कृषिमंत्री तोमर, बाबा अमन सिंग, पंजाब पोलिसांचे अधिकारी गुरमित सिंग पिंकी दिसत आहे. पिंकी यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांना हत्येच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते. हा फोटो सुमारे दोन महिन्यांपूर्वीचा आहे. रिपोर्टनुसार सिंघू बॉर्डरवर झालेल्या दलित शीखाच्या हत्येप्रकरणी अमन सिंग याच्या समुहातील सदस्य हा मुख्य आरोपी आहे. दरम्यान, अमन सिंग याने या हत्येचे समर्थन केले होते.
दरम्यान, अमन सिंग याने मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मला शेतकरी आंदोलनाचे आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आसली होती. माझ्या संघटनेलाही १ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आम्हाला खरेदी करता येणार नाही.
दरम्यान, निहंग सिंघू बॉर्डरवर राहतील की नाही याचा निर्णय २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र कृषी मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरमित सिंग यांनी सांगितले की, मी बाबा अमन यांना ओळखतो आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही मंत्र्यांच्या घरी गेलो होतो, हे खरे आहे. मात्र या भेटीचा हेतू वेगळा होता. मी काही वैयक्तिक कामामुळे तिथे गेलो होतो. निहंग प्रमुख कृषी कायद्यांवर चर्चा करत होते. मात्र तिथे पैसे देण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही. अमन सिंग आणि नरेंद्र सिंग तोमर यांच्यात काय ठरले, हे मला माहिती नाही. पंजाबचे उपमुख्यमंत्री रंधावा यांनी नाव न घेता दावा केला की, हाच निहंग नेता हत्येच्या मुख्य आरोपीचा बचाव करत होता. या समुहाने पीडितावर शीख समुदायाच्या पवित्र ग्रंथाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, निहंग नेते हे भारत सरकार आणि कृषिमंत्र्यांशी संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, असा दावाही रंधावा यांनी केला आहे.