गेल्या २ महिन्यांपेक्षा अधिक काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले होते. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळालं होतं. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत गृहसचिव आणि दिल्लीचे पोलीस आयुक्तदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर कायदा सुव्यवस्थेसाठी मजबूत व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 5:23 PM
आज आंदोलनाला लागलं हिंसक वळण
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला लागलं हिंसक वळणदिल्लीतील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद