Farmers Protest: विविध मागण्यासांठी राजधानी दिल्लीकडे निघालेले हजारो शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान युनियन सिद्धुपूर आणि पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीने हे आंदोलन छेडले आहे. यादरम्यान भारतीय किसान युनियन सिद्धूपूरचे अध्यक्ष जगजीत सिंह डल्लेवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये पीएम मोदींवर टीका करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?व्हिडीओमध्ये डल्लेवाल म्हणतात, 'आपल्याकडे खुप कमी संधी आहे. राम मंदिर बांधल्यामुळे मोदींचा आलेख खूप उंचावला आहे. आपल्याला हा आलेख खाली आणावा लागेल.' यासंदर्भात डल्लेवाल यांच्याशी मीडियाने चर्चा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
व्हिडिओवर सीएम खट्टर यांची प्रतिक्रिया?हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, ते योग्य नाही. ते आक्रमक सैन्याप्रमाणे दिल्लीकडे कूच करू पाहत आहेत. शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली, जीसेबी आणि रेशन घेऊन सैन्याप्रमाणे दिल्लीकडे निघाले आहेत. आंदोलनावर आक्षेप नाही, त्यांच्या पद्धतीवर आमचा आक्षेप आहे. डल्लेवाल यांचे विधान राजकीय आहे. निषेध करण्याचा हा योग्य मार्ग नाही, असा संदेश जनतेमध्ये जातोय, असं ते यावेळी म्हणाले.