आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकरीदिल्लीत प्रवेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी संवाद साधला आहे. "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" असं म्हटलं आहे.
"आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं. "आज केंद्रीय मंत्र्यांसोबत आमची बैठक आहे. बैठकीत आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहेत. या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. आमच्या मागण्या नवीन नाहीत. हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" असं सरवन सिंग पंढेर यांनी सांगितलं.
"आम्हाला असं वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा आणि आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे. आज आपली केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक आहे. आमच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी देखील चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे."
"भारत हा लोकशाही देश आहे, त्यामुळे आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने सर्व अडथळे दूर करावेत. आज चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार आहे" अशी माहिती सरवन सिंग पंढेर यांनी दिली आहे.