नवी दिल्ली : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने (X) एक पोस्ट केली आहे. यामध्ये भारत सरकारने अलीकडेच एक्स प्लॅटफॉर्मला काही अकाउंट्स आणि पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. एक्सने हा आदेश स्वीकारला आहे आणि त्या अकाउंट्सवर कारवाई केली आहे, परंतु त्यासोबत आमची असहमती देखील नोंदवली आहे, असे एक्सने म्हटले आहे.
भारत सरकारने अलीकडेच एक्सवरून काही अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश कंपनीला दिले होते. याबाबत एक्सच्या Global Government Affairs ने पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारत सरकारच्या आदेशानंतर काही एक्स अकाउंट्स ब्लॉक किंवा सस्पेंड करण्यात येत आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
ब्लॉक केलेल्या अकाउंट्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील अनेक अकाउंट्स आणि वेबसाइट्स काही काळीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलनासंबंधीचे अकाउंट्स आणि वेबसाइट्स ही कारवाई करण्यात आली आहे. भारत सरकार सामाजिक सलोखा बिघडू शकेल असे वादग्रस्त अकाउंट्स किंवा सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश देते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) 14 आणि 19 फेब्रुवारी रोजी हे आदेश जारी केले होते. गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत ही अकाऊंट्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखता यावी यासाठी काही सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्स तात्पुरते बंद करण्यात आली आहेत.
भारत सरकारच्या आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, कोणत्याही वेबसाइट्स किंवा सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती लोकांसाठी बंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. या कायद्यानुसार जून 2020 मध्ये सरकारने अनेक चिनी वेबसाइट बंद केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट्स आणि वेबसाइट्सच्या लिंक्स बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही अकाऊंट्स काही काळासाठीच बंद करण्यात आली असून, शेतकऱ्यांचा विरोध संपल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.