चंदीगड : पंजाबातील शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल (वय ७०) यांनी एक ग्लास पाणी प्राशन केले असले तरी आपले बेमुदत उपोषण सोडलेले नाही, असे स्पष्टीकरण शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी शनिवारी दिले.
१९ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या शेतकरी नेत्यांची सुटका केल्यानंतर डल्लेवाल यांनी एक ग्लास पाणी प्राशन करून आपले उपोषण सोडले, अशी माहिती पंजाब सरकारच्या वतीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली होती. डल्लेवाल हे २६ नोव्हेंबर २०२४ पासून उपोषण करीत आहेत. ४ महिने ११ दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले, असे पंजाब सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर कोहर यांनी सांगितले की, डल्लेवाल यांनी उपोषण सोडल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. सर्व शेतकऱ्यांची मुक्तता होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पंजाब व हरयाणातील शेतकरी शंभू व खनौरीच्या मधल्या सीमेवर संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन करीत आहेत.