नवी दिल्ली : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका शेतकऱ्याने चक्क लाल रंगाची भेंडी पिकवली असून, या भेंडीला थोडाथोडका नव्हे, तर प्रति किलो ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.
मिश्रीलाल राजपूत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो भोपाळ जिल्ह्यातील खजुरिया कलान गावचा रहिवासी आहे. त्याने वाराणसी येथील एका कृषी संशोधन संस्थेकडून एक किलो बियाणे खरेदी केले होते. अनोख्या लाल रंगाची ही भेंडी आहे. ४० दिवसांत तिचे उत्पादन सुरू झाले.राजपूत यांनी सांगितले, ही भेंडी पोषण तत्त्वांच्या दृष्टीनेही अधिक सरस आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी ही भेंडी अत्यंत उपयुक्त आहे. या भेंडीला बाजारात नेहमीच्या भेंडीपेक्षा ५ ते ७ पट अधिक भाव मिळत आहे. मॉल्समध्ये या भेंडीचा प्रति किलोचा भाव सुमारे ८०० रुपयांपर्यंत येतो.
यंदा जूनमध्ये संकल्प परिहार यांच्या शेतातील लाल माणकासारख्या रंगाच्या आंब्याची अशीच ख्याती पसरली होती. हा आंबा जपानचा मियाझाकी आंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. या आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २.७० लाख रुपये किलो इतकी अफाट आहे.