नवी दिल्ली : शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हजारो शेतकरी दिल्ली आणि नोएडाच्या सीमेवर पोहोचले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-नोएडाच्या सर्व सीमेवरील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे. लवकरच रस्त्यावर उतरून दलित प्रेरणा स्थळावर आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.दरम्यान, दिल्लीच्या चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, कालिंदीकुंज येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केल्यानंतरच वाहतूक मार्ग वळवण्यात आला.
नोएडाच्या सेक्टर 15 ए ते दिल्ली आणि कालिंदीकुंज ते चिल्ला बॉर्डरमार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सकाळपासून नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सोमवार असल्याने लाखो लोक कार्यालयात आले आहेत. मात्र, त्यांना परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामाया उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली आहे.
लोकांना वाहतूक कोंडी टाळता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनी आधीच सूचना जारी केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांनी महामार्गावरच आंदोलन सुरु केले. शेतकरी सातत्याने घोषणा देत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मीडियाशी बोलताना पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता म्हणाले, "आम्हाला आधीच काही शेतकरी संघटनांबद्दल माहिती मिळाली होती. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येण्याची परवानगी दिली नाही."
नवी दिल्लीत बीएनएसचे कलम १६३ लागूनवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. जॉइंट सीपी संजय कुमार यांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चसंदर्भात विविध ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. ते म्हणाले, "संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. महामाया उड्डाणपूल, डीएनडी किंवा कालिंदीकुंज येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरुन कोणताही जमाव परवानगीशिवाय आत जाऊ नये."