अमृतसर/होशियारपूर/हिसार : संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी आपल्या आंदोलनातील नवे शस्त्र बाहेर काढून जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढा, हा मुद्दा लावून धरला. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून महामार्गांची कोंडी केली.
शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत न होता ट्रॅक्टर पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, पंजाबच्या होशियारपूरमध्ये जालंधर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचे ट्रॅक्टर उभे केले. दोआबा किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष जंगवीर सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तांडा येथील ‘बिजली घर’ चौकातही ट्रॅक्टर रस्त्यावर उभे केले. एका मेळाव्याला संबोधित करताना चौहान यांनी ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणांवर टीका केली आणि ते शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले आहे.
किसान युनियन (राजेवाल), बीकेयू (काडियान), बीकेयू (एकता उग्रहण) यासारख्या अनेक शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी होशियारपूर-फगवाडा रोड, नसराला-तारागड रोड, दोसरका-फतेहपूर रोड, बुल्लोवाल-इलोवाल रोड आणि भुंगा येथे निदर्शने केली.
...म्हणून एमएसपी मिळत नाहीnअमृतसरमध्ये अजनाला, जंदियाला गुरू, रय्या आणि बियास येथे शेतकऱ्यांनी आपली वाहने महामार्गावर उभी केली. लुधियाना-चंडीगड रस्त्यावरही अशीची परिस्थिती होती. हरयाणाच्या हिसारमध्ये शेतकऱ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५० ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून निषेध केला.nडब्ल्यूटीओच्या धोरणांमुळे सरकार सर्व पिकांवर एमएसपी देत नाही, असा दावा अखिल भारतीय किसान सभेचे (एआयकेएस) राज्य उपाध्यक्ष समशेर सिंग नंबरदार यांनी केला. nपश्चिम उत्तर प्रदेशात, भारतीय किसान युनियनने (बीकेयू) केलेल्या आवाहनानंतर ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी निदर्शने केली आणि प्रातिनिधिक पुतळ्यांचे दहन केले.
...ती आत्महत्या ठरेलशेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला डब्ल्यूटीओ करारातून बाहेर काढण्याची मागणी करत ‘डब्ल्यूटीओ’चे प्रातिनिधिक पुतळे जाळले आणि घोषणाबाजी केली. १३व्या मंत्रिस्तरीय परिषदेसाठी अबूधाबी येथे १६४ डब्ल्यूटीओ सदस्य देशांचे व्यापार मंत्री एकत्र आले असताना निदर्शने करण्यात आली. डब्ल्यूटीओचे उद्दिष्ट शेती अनुदान संपवणे आहे. जर भारताने कृषी आघाडीवर डब्ल्यूटीओच्या धोरणांचे पालन केले तर ती आत्महत्या ठरेल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरने घेरावलालफितीचा कारभार आणि स्वस्त आयातीच्या स्पर्धेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरसह घेराव घातला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मुख्यालयाबाहेर काँक्रीट अडथळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस गस्त घालत होते. येथे २७-राष्ट्रीय गटांचे कृषिमंत्री एकत्र येत आहेत.आंदोलकांनी शेतकरी हळूहळू संपत असल्याचा आरोप केला. ‘लहानपणी तुम्ही शेती करण्याचे स्वप्न पाहतात, आणि प्रौढ झाल्यावर तुम्ही त्यात मरतात,’ अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली. शेतकऱ्यांनी युरोप महासंघाच्या मुख्यालय इमारतीपासून काहीशे मीटर अंतरावर टायर आणि रबराचे ढिगारे पेटवले. महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारची हिंसक निदर्शने झाली होती. त्या वेळी युरोप महासंघ नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गवताच्या गाठी जाळल्या आणि अंडी, फटाके पोलिसांवर फेकले होते. संपूर्ण युरोपमधील शेतकऱ्यांचे निषेध मोर्चे आणि निदर्शनांच्या मालिकेत आता ब्रुसेल्स येथील निदर्शनांची भर पडली आहे.