मैसूरी, दि. २ - पंचायतीने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावल्याने हतबल झालेल्या शेतक-याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कर्नाटकमधील मैसूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचायतीतील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्यांचा शोध सुरु आहे.
मैसूर जिल्ह्यातील सालगुंडी गावात सिद्धगोव गौडा (वय ५६) व त्यांचे कुटुंबीय राहतात. काही दिवसांपूर्वी गावात दवंडी पिटणा-या व्यक्तीसोबत गौडा यांचा वाद झाला होता. आमच्या घरासमोर दवंडी पिटली नाही असा गौडा यांचे म्हणणे होते. या वादातून दोघांमध्येही हाणामारी झाली व हा वाद थेट पंचायतीसमोर पोहोचला. पंचायतीने गौडा यांच्या विरोधात निकाल दिला व गौडा यांना दोन लाख रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले. पंचायतीच्या या निकालानंतर गौडा हे हताश झाले होते. एवढे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडला होता व या विवंचनेतूनच त्यांनी १२ जुलैरोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्यांचे ही झुंज अपयशी ठरली व त्यांचा मृत्यू झाला. गौडा कुटुंबीयांने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांनी गौडा कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. गौडा यांना कोणताही दंड ठोठावलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.