नवी दिल्ली : दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणे होती, असे पलानिस्वामी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जबाबात म्हटले आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या या जबाबावर आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ हेच कारण होते. कर्ज आणि दुष्काळ यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे विस्ताराने मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारने शुक्रवारी न्यायालयात म्हणणे मांडले. तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. ‘शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि राज्य सरकार काहीही करीत नाही हे दुर्दैवी आहे, असे मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत एका अशासकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज आणि उर्वरित सहकारी सोसायट्या आणि बँकांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिले होते.
शेतकरी आत्महत्या दुष्काळामुळे नाही
By admin | Published: April 29, 2017 12:38 AM