डेहरादून - उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे भाजपाला मतदान करू नका, असा संदेश या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. ईश्वरचंद्र शर्मा (65) असे या शेतकऱ्याचे नाव असून मंगळवारी पहाटेच विष पिऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
हरीद्वार जिल्ह्यातील दडकी या गावातील ईश्वरचंद्र यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. भाजपा सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे भाजपाला मतदान करू नका, अन्यथा ते प्रत्येकाला चहा विकायला लावतील, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. पोलिसांकडून या सुसाईड नोटची खात्री करुन घेण्यात येत आहे.
शर्मा यांना शेतीसाठी कर्ज हवे होते. त्यासाठी एका मध्यस्थी माणसाने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. मात्र, त्याबदल्यात पैसे देण्यासाठी या मध्यस्थ व्यक्तीकडून शर्मा यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करायचं असल्याने 4 लाख रुपयांच्या रकमेची मागणी दलालाने यांच्याकडे केली होती. दलालाकडून शर्मा यांना ब्लॅकमेलही करण्यात येत होते. शेतकरी शर्मा यांना 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर दलालानेच हे पैसे हडप केले. दलालाने शर्मा यांच्याकडून ब्लँक चेक सही करून घेतला होता. त्यामुळे कर्जाची रक्कम शर्मा यांच्या अकाऊंटमध्ये जमा होताच, त्याने ती रक्कम काढून घेतली, असेही शर्मा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी डेहरादून काँग्रेसने भाजपाला जबाबदार धरले असून भाजपाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यांच म्हटलं आहे. तसेच गेल्या 2 वर्षात 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही काँग्रेसने म्हटलंय.