ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यासाठी काय करायचं या विवंचनेत देश असताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मात्र हुंडा, प्रेमप्रकरणं, अपत्य न होणं, कौटुंबिक कलह आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक उत्तर राज्यसभेत दिले आहे.
राज्यसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाचा संदर्भ देत २०१४ मध्ये ५६५० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, आर्थिक विवंचनेसोबतच राधा मोहन यांनी प्रेमप्रकरणं, हुंडा अपत्यहीनता अशी अनेक कारणंही पुढे केल्यामुळे विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राधा मोहन सिंग यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कटुंबियांना भेटी द्याव्यात तर त्यांना सत्य परिस्थिती समजेल असे सांगितले तर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आपण कृषिमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.